Friday, March 16, 2018

गुढीपाडवा गुढी उभारूनच साजरा करणार....!

काही दिवसांपूर्वी एका व्हाट्सअप ग्रुप वर एक मेसेज आला होता. एका प्रथितयश व्यक्तीने लिहिलेला तो लेख होता. शीर्षक होते – ‘या वर्षीपासून गुढीपाडव्याला गुढी का उभारायची नाही ते वाचून ठरवा’ शीर्षक इंटरेस्टिंग वाटले म्हणुन लेख वाचल पण वाचल्यावर त्या सो कॉल्ड प्रथितयश व्यक्तीविषयी मनात असलेला आदर पार विरला. पण त्यानंतर हळूहळू तो लेखांश इकडून तिकडून बऱ्याच ग्रुपमध्ये, व्यक्तिगतपणेही येऊ लागल्यावर मग न रहावून विचारचक्र सुरु झाले आणि मग संस्कृतचा एक अभ्यासक या नात्याने सत्य सर्वांसमोर आणण्याची सांस्कृतिक जबाबदारी म्हणुन हा सर्व प्रपंच..!
सर्वात आधी हे स्पष्ट करतो की मला छत्रपतींविषयी अत्यंत आदर आहे हे वेगळे सांगायला नकोच शिवाय त्यांच्यामुळेच ‘संस्कृत’ आणि ‘संस्कृती’ विषयी सुद्धा पराकोटीची कृतीशील आस्थाही आहे.  मी जन्माने ब्राह्मण नाही. (जातीबद्दल बोलायचाच झालं तर माझा जन्म ९६ कुळी ‘मराठा’ कुटुंबात झाला आहे) त्यामुळे कोणत्याही प्रकारे हा लेखनप्रपंच कोणत्याही ‘जाती’च्या नजरेतून बघितला जाऊ नये ही कळकळीची विनंती...!
            ‘या वर्षीपासून गुढीपाडव्याला गुढी का उभारायची नाही ते वाचून ठरवा’ असा लेख लिहिणाऱ्या  ‘त्या’ लेखकाच्या म्हणण्यानुसार तो "गुढीपाडवा "या सणाच्या इतिहासात थोडे डोकावून पाहतोय आणि तसे डोकावून पाहिल्यावर ‘त्या’ला आढळलय की ‘गुढीपाडवा हा सण संभाजी राजांच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु झाला आणि त्या पुर्वी कधीच गुढ्या ऊभारल्याचा इतिहास नाही.’ पण इथेच मुद्दा उपस्थित होतो की ‘त्या’ने नेमका कोणता इतिहास वाचलाय? कारण गुढी उभारण्याबद्दलचे अनेको संदर्भ संभाजीराजांच्या आधीपासून आहेत. ज्ञानेश्वरीत (४.५१) म्हटलंय – ‘सज्जना करवी गुढी उभवी मी  ज्ञानेश्वरी(४.५१).  त्याच ज्ञानेश्वरीमध्ये (५.५२); (९.५०७); (१४.५१); (१८.४६५); (२४.४०६); अशा अनेक ठिकाणी गुढीचा संदर्भ आहे. (आता ज्ञानेश्वरमाउली संभाजी महाराजांच्या नंतर होऊन गेले असं ‘त्या’ला ‘त्या’ने वाचलेल्या इतिहासात आढळले असेल, आणि ‘त्या’ने ते मानले असेल तर अशा ‘त्या’ला काय म्हणावे हे वाचकांनीच ठरवावे...!)  ज्ञानेश्वरमाउलींप्रमाणेच नामदेव महाराजही म्हणतात ‘उभारिल्या गुढ्या आणि तोरणे, छायासुदर्शन धरीयेले’ (१०८९.३); सडा संमार्जने गुढिया तोरणे, शृंगारिली भुवनें परीचारिकी (९२९.२) नामदेव महाराजांच्या रचनांमध्ये गुढीबद्दलचे आणखीही अनेक संदर्भ आढळतात. अधिक माहितीसाठी (१२०.६); (३०३.६); (५०२.३); (२०७४.५); (२०९१.२); (१०२४.१२) हे संदर्भसुद्धा पाहावेत. ‘लीळाचरित्र’ ह्या मराठीतल्या आद्य रचनेतही गुढीचे संदर्भ आढळतात (पूर्वलीला-२४८); (पूर्वलीला-४३१); (उत्तरलीला-३३६) इ.
तर मग मराठीत असलेल्या या ग्रंथांमध्ये जर गुढीबद्दल संदर्भ आहेत, तर मग ‘त्या’ने असे का बरे लिहिले? बर आता आणखी स्पष्ट व्हावे म्हणुन थेट महाभारतातलेही काही संदर्भ पाहूयात. महाभारताच्या आदिपर्वामधील अंशावतरणपर्व या उपपर्वात ६३व्या अध्यायात श्लोक क्र. १७ ते २१ मध्येही गुढीचा आणि गुढी उभारण्याचा उल्लेख येतो.
‘उत्सवप्रियः खलु मनुष्य:’ मनुष्य हा सेलिब्रेशनप्रिय (उत्सवप्रिय) असतो. भारतीय सण हे आपल्या समृध्द परंपरेचे प्रतिक आहेत. आपण आपले सण खूप मोठ्या उत्साहात साजरे करतो. हे सण आपल्यामध्ये चैतन्य फुलवतात, एकोपा निर्माण करन्यास मदत करतात. आपल्या प्रत्येक सणाचे धार्मिक, मानसिक आणि सामाजिक महत्व आहे. त्यांना पावित्र्य आहे, इतिहास आहे...! आणि अशाच काही सणांपैकी अगदी महत्वाचा एक सण म्हणजे गुढीपाडवा. गेले काही दिवस काही ‘अन्यथानीतिज्ञ समाजकंटक’ या गुढीपाडव्याच्या सणाविषयी चुकीची आणि भ्रामक माहिती पसरवत आहेत, म्हणुन आपल्या या सणाविषयीची माहिती, धार्मिक महत्व, आणि इतिहास जाणून घेण्याच्या केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांदरम्यान जे दिसले-जाणवले-समजले ते संदर्भासह सर्वांसमोर मांडण्याचा हा प्रयत्न केला आहे.
ज्ञानेश्वर माउली, नामदेव महाराज, लीळाचरित्र आणि महाभारताचे संदर्भ लक्षात घेता ‘त्या’ तथाकथित विद्वान म्हणवून घेणाऱ्या ‘अन्यथानीतिज्ञ समाजकंटक’ व्यक्तीचे म्हणणे कितपत स्वीकारायचे ते सुज्ञ आणि विवेकी वाचकाने स्वतःच ठरवावे. एक विनंती मात्र करू इच्छितो की, वाचनसंस्कृती आणि चांगला सुज्ञ वाचकवर्ग हा तोंड (आणि facebook-whatsaap) वाजवणाऱ्यांच्या तुलनेत फार कमी असल्याने अशा ‘त्या’चे (आणि अर्थातच त्याच्यासारख्या असंख्य ‘त्यां’चे समाजविघातक विचार अधिक प्रसृत होतात. त्यामुळे ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती सोडून देऊन निदान आपल्या परंपरांचा होऊ घातलेला विपर्यास तरी होऊ नये या बाबतीत प्रयत्न करावा.  

Monday, November 20, 2017

ईश्वर !

रविरश्मीने प्रभात खुलवून अर्पि जन्म प्रतिदिनी नवा,
अन तिमिराच्या रात्रींनाही तूच देसी निष्पंद पहा ।
संबंधांच्या क्रीडा मानवीतू अलिप्त त्यातून कसा?
मी तर लिप्त-मग्न हा त्यातच तव मिलनास्तव वेडापिसा ।।

वाऱ्याचा अन तरुपर्णांचा, धरती अन या शशीचाहि,
ठाऊक जणु संबंध न तुजला, योग एकचि भक्तिचा ।
अन मम चिन्तन रात्रंदिन तव मनन आणि सहवासाचा,  
पुष्प-पत्र-जल-स्थल-आकाशी ठाव तुझ्या अस्तित्वाचा ।।

तू निराकार नृप निर्विकार, मी विकार मम तुज जडवोनि
हा शिल्पी कल्पितो रूप तुझे हे, रूप जे मनि वसलेले ।
सविकल्प असे ते रूप तुझे साकार-सगुण परब्रह्माचे,

ईश्वर ! दे रवीरश्मी, कर भक्षण तिमिर आणि अज्ञानाचे ।।
दान दे, वरदान दे

दान दे, वरदान दे मज आशिषे आव्हान दे !
आस दे, विश्वास दे अन् मनगटीला शक्ती दे !

 मागणे नाही न केवळ हीच तुजला प्रार्थना,
 तव जगी या मुक्त 'मी'पण तूच मजला व्याप ना!
तुजविना तडपे मरु मी काळजा तो घाव दे!
आस तुझीया भेटीची, मज युक्ति दे मज भक्ती दे !

आस दे, विश्वास दे अन् मनगटीला शक्ती दे !
दान दे, वरदान दे मज आशिषे आव्हान दे !
आस दे, विश्वास दे अन् मनगटीला शक्ती दे !

आरक्ति दे विरक्ति ही अनुरक्तिची संपन्नता,
जग जळुनी झाले खाक तरीही 'ध्रुव' असा संकल्प दे !
 मम अंतरीच्या तव विचारा अजरत्व दे ! अमरत्व दे !
 तव होऊनिया जाहण्याचा मोद दे ! आनंद दे !

आस दे, विश्वास दे अन् मनगटीला शक्ती दे !
 दान दे, वरदान दे मज आशिषे आव्हान दे !
आस दे, विश्वास दे अन् मनगटीला शक्ती दे !

आहुती घे ! दर्भ घे, घे घृतहवि 'अपूर्व' दे,
अंतरीचा भाव घे, कर्तृत्व दे, सामर्थ्य दे |
होता बनुनी हव्य जीवन हे तुला अर्पिन मी,

आनंद केवल कर समर्पित आयुच्या यज्ञात या ||

Friday, November 20, 2015

आज अचानक मनी का बरे, प्राजक्त बहर आला,
तव प्रीतीच्या चाहुलीने या हृदयसुगंधे न्हाला ||

श्रावणसरीच्या जलबिंदुसम बरसत तु हा आला,
अन् मातीच्या गंधामधुनी मोहनमन गायला ||

कुसुमफुलांच्या मुकुलांसम मग भीजले मी रंगले,
आन कुठे मग...! रंगी न्हाले, माझी मी न राहीले ||

पण......!

पण जाताना असा लोचनी सागरसम दाटला,
अधरांवरच्या अधरांवरती अश्रुरुपी दाटला ||

गेला जरी तो, मन वदले मग स्थुलरुपी तो गेला,
गेला जरी तो, तरीही, माझा, मीच बनुनी राहीला ||

अद्वैताच्या आनंदे या श्रावणसरी बरसल्या,
आज अचानक मनी असा हा प्राजक्त बहर आला ||

Friday, November 13, 2015

तत्त्वमुद्रा : नांदी - 'पांडुरंगम् भजाम्यहम्'

तत्त्वमुद्रा : नांदी - 'पांडुरंगम् भजाम्यहम्':     वन्दे संस्कृतमातरम् I  'ब्लॉग'आरम्भे विघ्न विघाताय  पांडुरंग स्मरणं करोमि I संस्कृतमातृचरनयो: नत्वा  अद्यप्रभृती लेखनकार्यं आ...

नांदी - 'पांडुरंगम् भजाम्यहम्'

  वन्दे संस्कृतमातरम् I

 'ब्लॉग'आरम्भे विघ्न विघाताय पांडुरंग स्मरणं करोमि I संस्कृतमातृचरनयो: नत्वा  अद्यप्रभृती लेखनकार्यं आरंभामि I 
  
 नमो नमः I 
भवदीय:
संदीपसागरः