Monday, November 20, 2017

ईश्वर !

रविरश्मीने प्रभात खुलवून अर्पि जन्म प्रतिदिनी नवा,
अन तिमिराच्या रात्रींनाही तूच देसी निष्पंद पहा ।
संबंधांच्या क्रीडा मानवीतू अलिप्त त्यातून कसा?
मी तर लिप्त-मग्न हा त्यातच तव मिलनास्तव वेडापिसा ।।

वाऱ्याचा अन तरुपर्णांचा, धरती अन या शशीचाहि,
ठाऊक जणु संबंध न तुजला, योग एकचि भक्तिचा ।
अन मम चिन्तन रात्रंदिन तव मनन आणि सहवासाचा,  
पुष्प-पत्र-जल-स्थल-आकाशी ठाव तुझ्या अस्तित्वाचा ।।

तू निराकार नृप निर्विकार, मी विकार मम तुज जडवोनि
हा शिल्पी कल्पितो रूप तुझे हे, रूप जे मनि वसलेले ।
सविकल्प असे ते रूप तुझे साकार-सगुण परब्रह्माचे,

ईश्वर ! दे रवीरश्मी, कर भक्षण तिमिर आणि अज्ञानाचे ।।
दान दे, वरदान दे

दान दे, वरदान दे मज आशिषे आव्हान दे !
आस दे, विश्वास दे अन् मनगटीला शक्ती दे !

 मागणे नाही न केवळ हीच तुजला प्रार्थना,
 तव जगी या मुक्त 'मी'पण तूच मजला व्याप ना!
तुजविना तडपे मरु मी काळजा तो घाव दे!
आस तुझीया भेटीची, मज युक्ति दे मज भक्ती दे !

आस दे, विश्वास दे अन् मनगटीला शक्ती दे !
दान दे, वरदान दे मज आशिषे आव्हान दे !
आस दे, विश्वास दे अन् मनगटीला शक्ती दे !

आरक्ति दे विरक्ति ही अनुरक्तिची संपन्नता,
जग जळुनी झाले खाक तरीही 'ध्रुव' असा संकल्प दे !
 मम अंतरीच्या तव विचारा अजरत्व दे ! अमरत्व दे !
 तव होऊनिया जाहण्याचा मोद दे ! आनंद दे !

आस दे, विश्वास दे अन् मनगटीला शक्ती दे !
 दान दे, वरदान दे मज आशिषे आव्हान दे !
आस दे, विश्वास दे अन् मनगटीला शक्ती दे !

आहुती घे ! दर्भ घे, घे घृतहवि 'अपूर्व' दे,
अंतरीचा भाव घे, कर्तृत्व दे, सामर्थ्य दे |
होता बनुनी हव्य जीवन हे तुला अर्पिन मी,

आनंद केवल कर समर्पित आयुच्या यज्ञात या ||